जेएनएन, भोपाळ. PM Narendra Modi On Ahilyabai Holkar Birth Anniversary: पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये महिला सक्षमीकरण महासंमेलनात सहभागी झाले. लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्तआयोजित या कार्यक्रमात सर्वत्र भगवा रंग भरला होता.

पाकिस्तानला कडक इशारा

ऑपरेशन सिंदूर हे पूर्णपणे महिलांच्या नेतृत्त्वात झालं आहे. आपल्या सैनिकांनी पाकिस्तानमधील शंभर पेक्षा अधिक किलोमीटर दूरच्या दहशतवाद्यांच्या स्थळांवर निशाणा साधत त्यांना उद्धवस्त केलं आहे. आता भारत हा दहशतवादाला खपवून घेणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तसंच, पंतप्रधान मोदी म्हणाले की, "देशातील प्रत्येक नागरिक… 140 कोटी भारतीय म्हणत आहेत की जर तुम्ही गोळी झाडली तर त्याचे उत्तर तोफगोळ्याने दिले जाईल."

बीएसएफच्या शूर कन्यांनी असाधारण शौर्य दाखवले

"ऑपरेशन सिंदूर हे आपल्या महिला शक्तीचे प्रतीक बनले आहे. या ऑपरेशनमध्ये बीएसएफने मोठी भूमिका बजावली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जम्मू, पंजाब, गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवरून बीएसएफच्या आपल्या मुली आघाडीवर होत्या. त्यांनी सीमापार गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. कमांड अँड कंट्रोल सेंटरपासून ते शत्रूच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यापर्यंत, बीएसएफच्या शूर कन्यांनी असाधारण शौर्य दाखवले." असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

    पंतप्रधान मोदींचे स्वागत

    महिलांनी सिंदूरी रंगाच्या साड्या परिधान करून कार्यक्रमात हजेरी लावली. महिला सक्षमीकरण परिषदेच्या व्यासपीठावर होळकर कुटुंबाची पगडी घालून पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले. बेतुलची धातूची कलाकृती आणि माहेश्वरी साडीचे कापड देखील देण्यात आले.

    विविध विकास कामाचं उद्घाटन, भूमिपूजन

    ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधानांचा मध्यप्रदेशातील हा पहिलाच दौरा आहे. सुरक्षेपासून व्यवस्थापनापर्यंत कार्यक्रमाचे सर्व सूत्र महिलांच्या हाती आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान इंदूर मेट्रोचे आभासी उद्घाटन, दातिया-सतना विमानतळ आणि उज्जैनमधील 29 किमी लांबीच्या घाटाचे आभासी भूमिपूजन करण्यात आलं. 

    देशातील पहिले 300 रुपयांचे नाणे जारी

    देवी अहिल्याबाईंच्या 300 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधानांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशातील पहिले 300 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले. या नाण्याचे वजन 35 ग्रॅम आहे आणि त्यात 50 टक्के चांदी आहे. एका बाजूला अहिल्याबाईंचा फोटो आहे. देशात आणि जगात जारी होणारे हे पहिलेच नाणे आहे, ज्याची किंमत 300 रुपये आहे.