ग्रेटर नोएडा. Nikki Murder Case : ग्रेटर नोएडामधील कासना कोतवाली येथील सिरसा गावात हुंड्याची 35 लाख रुपयांची मागणी पूर्ण न झाल्याने पत्नीवर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला जिवंत जाळण्यात आले. या भयानक घटनेनंतर लोकांचा राग उफाळून आला आहे.

रुपबास गावात मृताच्या घरी शोक व्यक्त करणाऱ्यांची लांबच लांब रांग आहे, तर लोक सोशल मीडियावरही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत आणि हुंडा मागणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

दरम्यान, पोलिस तपासात असे समोर आले आहे की आरोपीने निक्कीला ज्वलनशील पदार्थ (थिनर) ओतून जिवंत जाळले होते. महिनाभरापूर्वी विपिनने दिल्लीतील एका दुकानातून थिनर खरेदी केले होते. त्याने निक्कीला अनेक वेळा मारहाण केली होती. गेल्या एक महिन्यापासून तो निक्कीला मारण्याचा कट रचत होता.

विपिन भाटी हा एक बेरोजगार व गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे.  गावकऱ्यांनी सांगितले की तो कोणतेही काम करत नव्हता. तो रात्री डिस्कोमध्ये जायचा. त्याने घर चालवण्यासाठी निक्कीला पैसे देणे बंद केले होते. घर चालवण्यासाठी ती आपल्या वडिलांकडून अनेकदा पैसे घेत असे. नंतर निक्कीने घरी ब्युटी पार्लर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायला सुरुवात केली. आरोपीने ब्युटी पार्लरच्या नावाखाली थिनर खरेदी केले होते.

मृताच्या बहिणीचा आरोप आहे की त्याला जुगार खेळण्याची आणि डिस्कोमध्ये जाण्याची सवय होती. काहीही कमाई करण्याऐवजी तो निक्कीच्या ब्युटी पार्लरमधील कमाई त्याच्या व्यभिचारावर खर्च करायचा. त्यामुळे घरात वारंवार भांडणे होत असत. कुटुंबाने आरोपी पतीवर एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोपही केला आहे.

मृत महिलेचे काका राजकुमार यांनी सांगितले की, गेल्या वर्षी निक्कीने पतीला एका मुलीसोबत रंगेहाथ पकडले होते. निक्कीने तिच्या पालकांना याबद्दल माहिती दिली होती. तिच्या पालकांच्या बाजूचे लोकही तिथे पोहोचले होते. त्यानंतर वादही झाला होता. त्यावेळी सामाजिक लाज आणि आरोपी पतीने माफी मागितल्याने प्रकरण मिटले होते.

    त्याचवेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 2024 चा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये काही लोक विपिनशी भांडताना दिसत आहेत. तर एक मुलगी गाडीत बसली आहे.

    मृताची बहीण कांचन हिने सांगितले की, आग लावण्यापूर्वी काही वेळ भांडण झाले होते. तिने त्याचा व्हिडिओ बनवला. तिने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर निक्की वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली. आजारपणामुळे कांचनने डॉक्टरांना बोलावले आणि हातात ड्रिप लावून घेतला होता. त्यानंतर वरच्या मजल्यावरून "मला मारून टाका, मला संपवा" असे आवाज येऊ लागले. जेव्हा तिने ड्रिप काढून घटनास्थळाकडे धाव घेतली तेव्हा आगीने वेढलेली निक्की पायऱ्यांवरून खाली येत होती आणि तिच्या पती आणि सासूकडे जीवाची भीक मागत होती. आगीने वेढलेली निक्की पायऱ्यांवरून खाली उतरली आणि घराबाहेर मदतीसाठी धावली. कांचननेही आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु समोरचे भीषण दृश्य पाहून ती बेशुद्ध पडली.

    मोठी दीर व सासरा अटकेत, पतीच्या पायाला लागली गोळी -

    निक्की हत्याकांडाच्या तिसऱ्या दिवशी आरोपी असलेला मोठा दीर रोहित भाटी आणि सासरा सतवीर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दोघांना सिरसा टोल चौकातून ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पती विपिन भाटी व सासू दया यांना आधीच अटक केली आहे. सांगितले जात आहे की, पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या विपिनवर पोलिसांनी गोळीबार केला. गोळी पायाला लागल्याने तो जखमी झाला आहे. रविवार सायंकाळी त्याला कोर्टात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

    कुटुंबात शोककळा, आई रुग्णालयात दाखल-

    मुलीच्या मृत्यूनंतर रूपबास गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या लोकांनाही शोकाकुल कुटुंबाला रडताना पाहून अश्रू आवरता येत नाहीत. मृताची आई मंजू या घटनेपासून धक्क्यात आहे. ती वारंवार बेशुद्ध पडत आहे. रविवारी तिची प्रकृती खालावली. त्यानंतर तिला दादरी येथील  रुग्णालयात दाखल करावे लागले.