नवी दिल्ली. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) केरळमध्ये 2026 च्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाची संभाव्य तारीख 26 मे असल्याचे जाहीर केले आहे. ही तारीख 1 जूनच्या नेहमीच्या तारखेपेक्षा सुमारे सहा दिवस आधीची आहे. मान्सूनच्या आगमनाने दक्षिण भारतातील राज्यांना कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता असून, खरीप पिकांच्या पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.
24 तासांत अंदमानात मान्सून धडकण्याची शक्यता -
IMD च्या माहितीनुसार, पुढील 24 ते 48 तासांत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. 16 मेच्या आसपास मान्सून अंदमान परिसरात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 26 मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सूनचा अंदाज वर्तवण्याच्या बाबतीत IMD चे शानदार रेकॉर्ड -
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 21 वर्षांत आयएमडीचा अंदाज बहुतांशी अचूक ठरला आहे. फक्त 2015 साली अंदाज प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा वेगळे होते. गेल्या सहा वर्षांची आकडेवारी मान्सूनच्या बाबतीत हवामान विभागाच्या विश्वासार्हतेला अधिक बळकटी देतात.
🌧️ Southwest Monsoon 2026 Update 🌴
— India Meteorological Department (@Indiametdept) May 15, 2026
IMD forecasts the onset of Southwest Monsoon over Kerala around 26th May 2026 (± 4 days).
The operational forecast has shown high accuracy over the past 21 years.
☔ Stay tuned for timely weather updates and monsoon progress across the… pic.twitter.com/iing4kWKhI
6 जूनपर्यंत कोकणात मान्सूनची शक्यता
IMD च्या अंदाजानुसार, मान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता असून 6 जूनपर्यंत तो कोकणात पोहोचू शकतो. तसेच 7 जूनपर्यंत पुण्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
साधारणपणे मान्सून 20 मेच्या सुमारास अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचतो. मात्र, यंदा तो तब्बल पाच दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार केरळमध्ये 31 मेच्या आसपास पावसाचे आगमन होऊ शकते. त्यानंतर 5 ते 6 जूनदरम्यान मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केरळमध्ये आज पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) 15 मे रोजी केरळमधील इडुक्की आणि मलप्पुरम या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याच वेळी, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू आहे. यावरून हे स्पष्ट होते की, मान्सूनच्या आधीच दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण वाढत आहे.
हवामानशास्त्रज्ञांच्या मते, केरळमध्ये मान्सून वेळेपूर्वी दाखल झाल्यामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमानात घट होईल. हे खरीप पिकांच्या (जसे की भात, मका, कडधान्ये इत्यादी) पेरणीसाठी खूप फायदेशीर ठरेल. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पिकांची पेरणी करण्याची संधी मिळेल.
