जेएनएन, नागपूर: विभागात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी 16 ते 18 मेदरम्यान उष्णतेच्या तीव्र लाटेचा (हीट वेव्ह) यलो अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी नागरिक, विद्यार्थी आणि कामगारांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

उष्णतेची तीव्रता लक्षात घेता सकाळी 11ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये, कोचिंग सेंटर, औद्योगिक आस्थापना आणि विविध संस्थांनी विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले.

या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात विजयालक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर चर्चा करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘कोल्ड वॉर्ड’ तयार करण्याचे तसेच उष्माघातावरील उपचारांसाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. उष्माघाताच्या रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

मे आणि जून महिन्यात उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांसाठी ‘सेंटर होम’सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांनी उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील प्रमुख चौकांमध्ये ग्रीन नेट उभारण्यात येत असून, आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटरनाही आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

    दरम्यान, नागपूर जिल्ह्यात हीट वेव्ह संदर्भातील उपाययोजना १६ जूनपर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. बैठकीत वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनीही आपल्या जिल्ह्यातील तयारीची माहिती दूरदृश्य प्रणालीद्वारे सादर केली.

    हेही वाचा: Maharashtra Heat Wave: महाराष्ट्र तापला..! जालन्याचा पारा 42 अंशांवर, जनावरांसाठी शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल