जेएनएन, नवी दिल्ली: लाल किल्ल्यावर झालेल्या 79 व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या परेडमध्ये मराठमोळ्या लेफ्टनंट कमांडर जुई भोपे (Marathmoli Lieutenant Commander Jui Bhope) यांनी पंतप्रधान रक्षक दलाच्या पथक प्रमुख म्हणून नेतृत्वाची धुरा सांभाळली.

पंतप्रधान रक्षक दलाच्या पथकाचे नेतृत्व करण्याचा मिळाला मान 

मूळच्या नागपूरच्या असलेल्या जुई भोपे यांनी 2015 साली भारतीय नौदलात प्रवेश केला असून सध्या त्या लेफ्टनंट कमांडर पदावर कार्यरत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना सुरक्षा आणि संचलनाची जबाबदारी असलेल्या पंतप्रधान रक्षक दलाच्या पथकाचे नेतृत्व करण्याचा मान त्यांना मिळाला.

नागपूरमध्ये झाले आहे शिक्षण

मागील वर्षी झालेल्या गणराज्य दिन परेडमध्येही जुई भोपे यांनी भारतीय नौदलाच्या चित्ररथाचे नेतृत्व केले होते. त्यांचे शिक्षण नागपूर येथील सोमलवार हायस्कूलमध्ये झाले असून, पुढे रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही पदवी त्यांनी संपादन केली आहे.

जुई भोपे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन

    देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाल्याने लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांच्या कार्याचा सर्व स्तरातून गौरव आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.