Bihar News : राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेदरम्यान दरभंगा येथील आरजेडी आणि काँग्रेसच्या संयुक्त सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलच तापलं आहे. शुक्रवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयावर हल्ला करत जोरदार दगडफेक केली. त्यांनी कार्यालयातील सामानाची नासधूस करत काँग्रेसचे पोस्टर्स फाडले. यावेळी काँग्रेस व भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला.

भाजपाचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोदींबाबत वापरण्यात आलेल्या अपशब्दांच्याविरोधात काँग्रेसच्या कार्यालयावर हल्लाबोल केला.  बिहारची राजधानी पाटणा येथील काँग्रेसचे राज्य कार्यालय असलेल्या सदाकत आश्रमात शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक करत तोडफोड केली.  प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, डझनभर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला, परिसरात उभ्या असलेल्या ट्रकच्या काचा फोडल्या आणि मतदार अधिकार यात्रेचे पोस्टर्स फाडले.

हल्लेखोरांनी काँग्रेसचा झेंडाही फाडला आणि फेकून दिला, ज्यामुळे तणाव वाढला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. 

बिहारमध्ये सुरू असलेल्या राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा मुद्दा जोर धरत आहे. एनडीए नेते या मुद्द्यावर राहुल गांधी आणि काँग्रेसवर सतत हल्ला करत आहेत.

पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल वापरल्या जाणाऱ्या अपशब्दांवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, दरभंगा येथील मतदार हक्क यात्रेदरम्यान, काँग्रेस आणि राजदच्या व्यासपीठावरून, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या  दिवंगत. माताजींविरुद्ध ज्या प्रकारचे अपशब्द वापरले गेले ती भाषा अत्यंत अश्लील आहे आणि मी त्याचा निषेध करतो.