नवी दिल्ली- Assam Vidhan Sabha Election Result Update: आसाम विधानसभा निवडणूक 2026 साठी 9 एप्रिल 2026 रोजी मतदान पार पडले व ऐतिहासिक 85.38% मतदान झाले. सर्व 126 विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सुरू झाली. प्राथमिक कलानुसार भाजपने जोरदार मुसंडी मारत बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. अंतिम निकाल सायंकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे.
प्राथमिक कलानुसार भाजप 61 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस केवळ नऊ जागांवर पुढे आहे. आसाममध्ये मतमोजणी सुरू आहे. जोरहाट येथील मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आसाममधील सर्व 126 विधानसभा जागांसाठी 40 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी केली जात आहे.
मतांची मोजणी अनेक टप्प्यांमध्ये केली जाते. प्रत्येक टप्प्यानंतर, निवडणूक अधिकारी (RO) कोणत्या पक्षाला किती मते मिळाली हे नमूद करून, अधिकृत पोर्टलवर डेटा अपलोड करण्यापूर्वी त्यावर स्वाक्षरी करतात.
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, मतमोजणी आज, 4 मे 2026 रोजी सकाळी सुरू झाली. आसाममध्ये एकूण १२६ विधानसभा जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी एका पक्षाला 64 जागांची आवश्यकता असेल.
आसाममध्ये कोणाचे येणार सरकार ?
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 48 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आघाडीला 38 टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. जागांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, 126 जागांच्या विधानसभेत एनडीएला 88 ते 100 जागा मिळू शकतात, तर काँग्रेस आघाडीला 24 ते 36 जागा मिळू शकतात. मात्र, मतमोजणीनंतरच हे स्पष्ट होईल की एनडीए आसाममध्ये पुन्हा सरकार स्थापन करू शकेल की काँग्रेस यावेळी मोठा उलथापालथ घडवून आणेल.
722 उमेदवारांचे भवितव्य ठरणार -
आसाममधील 126 विधानसभा जागांवर 722 उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून, त्यासाठी सर्व 35 जिल्ह्यांमधील 40 मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ईव्हीएम उघडण्यात येणार आहेत.
प्रमुख चेहरे
प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, काँग्रेसचे उमेदवार गौरव गोगोई, एआययूडीएफ प्रमुख बद्रुद्दीन अजमल आणि रायजोर दल नेते अखिल गोगोई यांचा समावेश आहे.
