जेएनएन, मुंबई. वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) काँग्रेससोबत कोणतीही आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट करत वंचितने आगामी महापालिका निवडणुकांबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेसकडून आघाडीचा कोणताही औपचारिक प्रस्ताव न आल्याचा दावा वंचितकडून करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले की, “पहिले ‘आप’, पहिले ‘आप’ या भूमिकेमुळे याआधी काँग्रेस-वंचित युतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सध्याच्या घडीला काँग्रेससोबत आघाडीचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही. तसेच काँग्रेसने आम्हाला आघाडीचा प्रस्ताव दिला नाही तसेच वंचितकडूनही कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणार-
या घोषणेसोबतच वंचित बहुजन आघाडीने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत वंचित स्वतंत्रपणे म्हणजेच स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यादृष्टीने तयारीला सुरुवात झाली असून पक्षाने पाच नगरसेवक पदांचे उमेदवार जाहीर करून राजकीय हालचालींना वेग दिला आहे.
राजकीय समीकरणे बदलणार -
वंचितच्या या भूमिकेमुळे महापालिका निवडणुकांतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांसाठी ही बाब चिंतेची ठरू शकते. स्वतंत्र लढतीमुळे मतविभाजन होण्याची शक्यता असून त्याचा थेट फायदा सत्ताधारी पक्षांना होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वंचित बहुजन आघाडीने आगामी काळात आणखी उमेदवार जाहीर करण्याचे संकेत दिले असून, जनतेच्या प्रश्नांवर आधारित निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वंचितकडून आणखी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
