जेएनएन, मुंबई. Ganpati Bappa Santa Claus Ad:  नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध दैनिकांमध्ये देण्यात आलेल्या एका जाहिरातीमुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवण्यात आल्याने हिंदू समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या जाहिरातीवरून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत हा प्रकार हिंदू संस्कृती आणि श्रद्धेचा अपमान असल्याचा आरोप केला आहे.

सतेज पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकांच्या काळात हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या भाजप सरकारनेच हिंदू भावनांशी खेळ केला आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला एका पाश्चात्त्य सणाच्या प्रतीकात रूपांतरित करणे हे अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहे.”

“हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव आणणाऱ्या भाजपचा हा दुटप्पीपणा जनतेसमोर आला आहे. सत्तेसाठी आणि प्रचारासाठी देवतांचाही वापर करण्याची भाजपची प्रवृत्ती चिंताजनक आहे अशी टीका पाटील यांनी केली आहे.

या जाहिरातीमुळे सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी याला धार्मिक भावनांशी खेळ करणारा प्रकार असल्याचे म्हटले आहे. काही संघटना आणि नागरिकांनी संबंधित जाहिरात तात्काळ मागे घेण्याची तसेच जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, भाजपकडून या वादावर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, राज्यात महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धार्मिक भावना, सण-उत्सव आणि राजकारण यांचा मेळ घालण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

तुम्ही चर्चमध्ये गेलात म्हणजे गणपतीचंही धर्मांतर केलं का?

     या जाहिरातीवर ब्राम्हण महासभेचे पदाधिकारी आनंद दवे प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, हिंदूंचा, हिंदू देवतांचा अपमान करण्याची हिंमत सांस्कृतिक मंत्रालयाची अन् मंत्र्याची कशी होतेच कशी ? मोदीजी आपण चर्चमध्ये गेलात म्हणजे तुम्हाला गणपतीचं धर्मांतर करण्याची परवानगी तुम्हाला मिळाली  का? असा सवाल दवे यांनी केला आहे.