जेएनएन, मुंबई:आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने महापालिकांच्या जागावाटपासंदर्भात अंतिम चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेच्या जागावाटपाचा विषय सध्या अंतिम टप्प्यात आला असून, युतीतील काही मतभेद आणि तांत्रिक अडचणींमुळे 10 ते 15 जागांवर अद्याप तिढा कायम आहे. हा तिढा सोडवण्यासाठीच फडणवीस–शिंदे यांच्यात थेट चर्चा झाली आहे. दोन्ही नेत्यांकडून बैठकीत समन्वय साधून अंतिम निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई महापालिकेवर महायुतीचं लक्ष
मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीत बहुतांश जागांवर सहमती झाली असली, तरी काही प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचे इच्छुक उमेदवार, स्थानिक राजकारण आणि संघटनात्मक गणितांमुळे अडचणी निर्माण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर रात्रीच्या बैठकीत मुंबईतील संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या जागांवर तोडगा काढला असल्याचे बोलले जात आहे.
इतर महापालिकांचाही आढावा
फक्त मुंबईपुरतेच नव्हे, तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईसह इतर महापालिकांतील वादग्रस्त जागांवरही चर्चा झाली आहे. काही ठिकाणी जागावाटपात अडचणी आले असून, स्थानिक नेत्यांच्या नाराजीची दखल घेत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्याची तयारी दोन्ही पक्षांकडून सुरू आहे.
युतीत समन्वय
महापालिका निवडणुकांमध्ये युतीला एकसंघपणे उतरवण्यासाठी नेतृत्व पातळीवर समन्वय राखणे गरजेचे मानले जात आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील ही बैठक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.रात्रीच्या बैठकीनंतर जागावाटपासंदर्भातील चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, त्यानंतर उमेदवारांच्या अधिकृत घोषणा सुरू होणार आहेत.
हेही वाचा: Mumbai Local: पश्चिम रेल्वेच्या 27 डिसेंबर रोजी सुमारे 300 लोकल फेऱ्या रद्द; प्रवाशांचे होणार हाल
