जेएनएन, मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत समाजवादी पक्षाने पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर केली आहे. कोणत्याही युती किंवा आघाडीत सहभागी न होता ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय पक्षाने कायम ठेवला असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिली.
मुंबईतील गोवंडी, शिवाजीनगर आणि भायखळा या परिसरात समाजवादी पक्षाचा पारंपरिक प्रभाव राहिला आहे. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत या भागांमधून पक्षाने सहा जागांवर विजय मिळवला होता. या विजयाच्या जोरावर पक्षाने आपली स्थानिक पकड मजबूत ठेवली असून, यंदाच्या निवडणुकीत याच मतदारसंघांबरोबरच इतर संभाव्य जागांवरही विजय मिळवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. तर काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळणारे मुस्लिम मतावर समाजवादी पक्षाचा डोळा आहे.
स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार
अबू आझमी यांनी स्पष्ट केले की, यंदाची पालिका निवडणूक समाजवादी पक्ष स्वबळावरच लढणार आहे. कोणत्याही मोठ्या पक्षासोबत युती करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “मागील निवडणूकही आम्ही स्वबळावर लढवली होती आणि त्या निवडणुकीत आम्हाला समाधानकारक यश मिळाले होते. यंदा त्या तुलनेत अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे,” असे आझमी म्हणाले.
मतदारांमध्ये पक्षाचा विश्वास
गोवंडी, शिवाजीनगर आणि भायखळा परिसरात अल्पसंख्याक, कामगारवर्ग आणि मध्यमवर्गीय मतदारांमध्ये समाजवादी पक्षाचा चांगला प्रभाव आहे. स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे, नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी लढा देणे आणि विकासकामांवर भर देणे ही पक्षाची ओळख राहिली आहे. याच मुद्द्यांच्या जोरावर मतदारांचा विश्वास अधिक मजबूत करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
उमेदवार निवडीवर लक्ष
यंदाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू असून, जिंकण्याची क्षमता असलेल्या प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यात सक्रिय असलेले चेहरे आणि जनतेशी थेट संपर्क असलेले उमेदवार देण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती आझमी यांनी दिली आहे.
जागा वाढवण्याचे लक्ष्य
2017 च्या तुलनेत यंदा अधिक जागांवर विजय मिळवण्याचा आत्मविश्वास समाजवादी पक्षाने व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेतील सत्ताकारणात आपली ताकद वाढवण्यासाठी पक्षाकडून आक्रमक तयारी सुरू असून, ‘एकला चलो रे’च्या भूमिकेवर ठाम राहत समाजवादी पक्ष ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा: मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत जाणार;काँग्रेसचा काय होणार
