जेएनएन, मुंबई: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांसोबत युती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटातील मुंबईतील स्थानिक नेतेही या युतीसाठी अनुकूल असल्याचं चित्र आहे.मात्र काँग्रेस पक्षासोबत सोबत आघाडी बाबत अजूनही कुठलीही चर्चा सुरू झाली नाही.
यामुळे काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.माहितीनुसार, मुंबईत एकत्र लढण्याबाबत आतापर्यंत दोन वेळा प्राथमिक चर्चा झाले असून, जागावाटपाबाबतची अंतिम चर्चा लवकरच होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीनंतर मुंबईतील राजकारणात मोठे समीकरण तयार होणार आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून युतीसाठी ऑफर आली असली, तरी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात अद्याप एकदाही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी शरद पवार गटाचा कल ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या उमेदवारांच्या आज प्रदेश कार्यालयात मुलाखती घेण्यात येणार आहे. या मुलाखती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असून, संभाव्य उमेदवारांची चाचपणी आणि संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे युती, जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू आणि शरद पवार गट एकत्र आल्यास, मुंबईत मोठी आघाडी निर्माण होऊ शकते.
हेही वाचा: ठाकरे बंधूंच्या युतीचा फॉर्म्युला ठरला; जागावाटपावर अंतिम बैठक, मुंबईत काही जागांवर त्यागाची तयारी
