जेएनएन, मुंबई. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधातील आंदोलनाची तीव्रता राज्यात वाढत असल्याचे गुप्तचर विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. 25 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान राज्यात तब्बल 88 आंदोलने झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. या आंदोलनांमध्ये विविध राजकीय पक्षांसह विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांचा सहभाग वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

गुप्तचर अहवालानुसार, 25 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या 88 आंदोलनांपैकी काँग्रेसकडून 57, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 7, ठाकरे गटाकडून 5, डाव्या पक्षांकडून 16 आणि कॉकरोच जनता पार्टीकडून 2 आंदोलनांचे आयोजन करण्यात आल्याची नोंद आहे. त्यामुळे SIR आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधातील राजकीय विरोध राज्यातील विविध भागांत वाढत असल्याचे चित्र आहे. 

शिवाजी पार्कमधील CJP च्या आंदोलनाची विशेष नोंद 

2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचीही गुप्तचर अहवालात विशेष नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार, या आंदोलनाला सुमारे 10 हजार जणांची उपस्थिती होती. विद्यार्थी, तरुण, सोशल मीडिया क्रिएटर आणि कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत अभिजीत दिपके यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचेही गुप्तचर विभागाने निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे सोशल मीडिया माध्यमातून आंदोलनाचा संदेश मोठ्या प्रमाणात तरुणांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे.

ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा

    दरम्यान, 4 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत संयुक्त मोर्चा काढत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIRच्या विरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटानेही पाठिंबा दिला होता. त्यामुळे SIR विरोधातील आंदोलनाला आता विविध राजकीय पक्षांचे समर्थन मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

    पुण्यात MPSC आंदोलनही केंद्रस्थानी 

    SIR विरोधातील आंदोलनासोबतच पुण्यातील MPSC परीक्षार्थींचे आंदोलनही युवकांच्या आंदोलनाचे महत्त्वाचे केंद्र बनले असल्याचे गुप्तचर अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुण्यातील आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत असल्याचे निरीक्षण आहे. 

    सध्या विद्यार्थी उपोषणाला बसले असून आंदोलनस्थळी दिवसभर विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिस यंत्रणा तपासत आहे. 

    10 ऑक्टोबरच्या दिल्लीतील आंदोलनाकडे लक्ष 

    दरम्यान, 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे प्रस्तावित CJPच्या आंदोलनाकडे महाराष्ट्र पोलिस आणि गुप्तचर यंत्रणेचे विशेष लक्ष राहणार आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून किती आंदोलक दिल्लीला जातात, विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग किती असतो आणि सोशल मीडियावर आंदोलनाबाबत कोणत्या प्रकारच्या पोस्ट केल्या जातात, यावर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

    तसेच पुढील 72 ते 96 तासांमध्ये होणाऱ्या संभाव्य कायदेशीर आणि पोलिस कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवण्याची शिफारस गुप्तचर विभागाने केली आहे. आंदोलनाचा विस्तार, गर्दीचे स्वरूप, सोशल मीडिया प्रतिसाद आणि विविध संघटनांचा सहभाग याचा आढावा घेऊन पुढील कायदा-सुव्यवस्थेची रणनीती निश्चित करण्याची शक्यता आहे. 

    युवकांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय? 

    SIR विरोधातील राजकीय आंदोलनांपासून ते MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनापर्यंत विद्यार्थी आणि तरुणांचा वाढता सहभाग हा गुप्तचर यंत्रणेच्या निरीक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आंदोलनांची माहिती वेगाने प्रसारित होत असल्याने अल्पावधीत मोठ्या संख्येने तरुण एकत्र येण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.