एजन्सी, मुंबई. मुंबई–नागपूर प्रवासाचा वेळ कमी करून महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेला 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग डिसेंबर 2022 पासून टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, महामार्ग सुरू झाल्यापासून अपघात आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची मालिका कायम आहे. उपलब्ध पोलीस आणि माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, समृद्धी महामार्गावर साडेतीन वर्षांत 633 अपघातांमध्ये तब्बल 572 जणांचा मृत्यू झाला आहे.
आठ महिन्यांत 128 जणांचा मृत्यू
2026 मधील आकडेवारी विशेष चिंताजनक आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2026 या केवळ आठ महिन्यांत महामार्गावर 142 अपघात झाले असून त्यात 128 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच या आठ महिन्यांत झालेल्या मृत्यूंची संख्या 2024 च्या संपूर्ण वर्षातील मृत्यूसंख्येपेक्षाही जास्त आहे.
2024 मध्ये समृद्धी महामार्गावर 137 अपघातांमध्ये 126 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2025 मध्ये अपघातांची संख्या वाढून 185, तर मृतांची संख्या 152 झाली. महामार्ग पोलीसांच्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये 2024 च्या तुलनेत अपघातांमध्ये सुमारे 35 टक्के वाढ झाली होती.
| कालावधी | अपघात | मृत्यू |
| 2024 | 137 | 126 |
| 2025 | 185 | 152 |
| जानेवारी – ऑगस्ट 2026 | 142 | 128 |
| डिसेंबर 2022 – ऑगस्ट 2026 | 633 | 572 |
