मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘अल्ला हाफिज’ म्हणतानाचा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट फडणवीस यांना इशारा दिला आहे. “वेळ आल्यास सर्व व्हिडिओ बाहेर काढले जातील,” असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत युतीची घोषणा करत असताना हा मुद्दा उपस्थित केला. आजकाल कोणाचा कोणता व्हिडिओ कधी बाहेर येईल, याचा नेम नाही. राजकारणात निवडक व्हिडिओ दाखवून वातावरण तापवण्याचा प्रकार सुरू आहे. पण सगळ्यांकडेच भूतकाळ आहे. वेळ आली, तर प्रत्येकाचे व्हिडिओ बाहेर येऊ शकतात, असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी दिला.
नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांचा काही वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात ते ‘अल्ला हाफिज’ असे म्हणताना दिसतात. हा व्हिडिओ काही संघटनांकडून आणि सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर केला जात असून, त्यावरून राजकीय टीका सुरू झाली आहे. काही जण हा व्हिडिओ धार्मिक भावनांशी जोडत प्रश्न उपस्थित करत आहेत.
राज ठाकरेंची भूमिका-
राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना दुटप्पी राजकारणावर बोट ठेवले. एकीकडे सत्ताधारी लोक भाषणांत मोठमोठ्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे जुन्या व्हिडिओंवरून राजकारण खेळतात. हे बंद व्हायला हवं. अन्यथा या खेळात सगळेच उघडे पडतील, असेही राज ठाकरे म्हणाले. निवडणुका जवळ आल्या की अशा गोष्टी मुद्दाम पुढे आणल्या जातात. महाराष्ट्रात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत; पण चर्चा मात्र व्हिडिओंची, अशी टीका ठाकरे यांनी केली.
भाजपची सावध प्रतिक्रिया!
या वादावर भाजपकडून अधिकृतपणे अद्याप ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र पक्षातील काही नेत्यांनी हा व्हिडिओ जुना असून त्याचा संदर्भ वेगळा असल्याचे सांगितले आहे. “धर्माच्या नावावर राजकारण करून महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये,” असे राज ठाकरे यांनी मत व्यक्त केले.
