मुंबई. BMC Election 2026:  पुढील महिन्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडी गतिमानझाल्या आहेत. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या तयारीसाठी कंबर कसली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धती अवलंबण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, एक मोठी राजकीय घडामोडी घडली आहे. जवळजवळ दोन दशकांनंतर ठाकरे चुलत बंधू उद्धव ठाकरे (शिवसेना यूबीटी) आणि राज ठाकरे (मनसे) हे बीएमसी निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. आज, दोन्ही भावांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत औपचारिकपणे त्यांच्या युतीची घोषणा केली. मुंबईतील वरळी येथील हॉटेल ब्लू सी येथे पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी युतीची घोषणा केली. मात्र जागावाटप सांगितले नाही.

ठाकरे बंधूंच्या (Shivsena UBT MNS Yuti) युतीची घोषणा मुंबईतील ब्लू सी हॉटेलमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली गेली. पत्रकार परिषदेआधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर गेले आणि त्यांना अभिवादन केले.

मनसे आणि उद्धव ठाकरे गट मुंबईसह राज्यातील सात महानगरपालिकांमध्ये युती करून  लढणार आहेत. त्यामुळे आजच्या युतीच्या घोषणेकडे राज्यभरातील ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.  दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची उत्कंठा होती. आज तो ऐतिहासिक क्षण आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत.

 आज पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (raj thackeray and uddhav thackeray) यांनी एकत्रित बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.  यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असे संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते.  बाळासाहेब ठाकरे यांना चाफ्याची फुले खूप आवडायची.  त्यामुळे उद्धव व राज यांनी चाफ्यांच्या फुलांचा हार स्मृती स्थळावर अर्पण केला. 

आता चुकाल तर संपाल

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपच्या वरच्या लोकांना मुंबईचे लचके तोडायचे आहेत. आता आम्ही भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल. आमचे संपूर्ण ठाकरे कुटूंब संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत संघर्ष करत होते.  राज व मी एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, हे मी पूर्वीच सांगितले आहे. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जो आमच्यावर चाल करून आला तो परत गेला नाही, हा इतिहास आहे.  विधानसभा निवडणुकीत भाजपने कटेंगे तो बटेंगे असा अपप्रचार केला होता. आता मी मराठी माणसाला सांगतो की, आता चुकाल तर संपाल, त्यामुळे मराठीचा वसा टाकू नका. 

    असे माझ्याकडे खप व्हिडिओ -

    पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, त्यांचा एका भाषणात अल्लाह हाफिज म्हणतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. असे खूप व्हिडिओ माझ्याकडे आहे. वेळ आल्यावर दाखवूच. सध्या राज्यात मुले पळवणाऱ्या टोळ्या आल्या आहेत. त्यात आणखी दोन टोळ्यांची भर पडली आहे.  त्यामुळे जागावाटप नंजर जाहीर केले जाईल. 

    संजय शिरसाटांची प्रतिक्रिया -

    महाराष्ट्र सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी 2026 च्या नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना-यूबीटी आणि मनसे युतीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, जर या लोकांचा लोकांवर प्रभाव असता तर अलिकडच्या नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत त्यांना एवढा पराभव का सहन करावा लागला असता? आज ही युती त्यांच्यासाठी एक मजबुरी आहे, कारण काँग्रेसही शिवसेनेसोबत नाही, शरद पवारही त्यांच्यासोबत नाहीत, म्हणून त्यांना कोणाची तरी गरज आहे. बुडणारा माणूस जसा गवताला घट्ट पकडतो, तसेच उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा आधार घेऊ इच्छितात. तथापि, मला वाटत नाही की त्याचा फारसा फायदा होईल.