मुंबई. Zilla Parishad Election Result 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी मतदान (Zilla Parishad And Panchayat Samiti Election Result 2026) प्रक्रिया पार पडल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणी सुरु आहे. जिल्हा परिषदांचे कल हळूहळू स्पष्ट होत असून यात भाजप नगरपालिका व महापालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद निकालातही नंबर वन ठरला आहे. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांचे निकाल जाहीर होत आहेत. दुपारपर्यत सर्व निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 12 जिल्ह्यात एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान राज्यातील जिल्हा परिषदेतील 731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 382 जागांचे कल हाती आले असून त्यात भाजपने शंभरी ओलांडली आहे. भाजप सध्या 133 जागावर आघाडीवर आहे. तर शिवसेना शिंदे गट- 88, राष्ट्रवादी अजित पवार गट- 85, काँग्रेस- 28, शिवसेना ठाकरे गट- 20, राष्ट्रवादी शरद पवार गट- 7, इतर- 21 जागांवर आघाडीवर आहेत. जिल्हा परिषद निकालात महायतीची सरशी झाल्याचे दिसून येत आहे.
पंचायत समितीमध्येही भाजपच नंबर 1-
भाजप 7, एकनाथ शिंदे शिवसेना 2 आणि सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस 2 जिल्हा परिषदांमध्ये आघाडीवर आहे. पंचायत समितीमध्येही हेच चित्र दिसतंय, 125 पैकी तब्बल 84 पंचायत समित्यांमध्ये भाजपनेच अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. पंचायत समितीत भाजप 25, शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी सुनेत्रा पवार 18 ठिकाणी आघाडीवर आहे. नगर परिषदा, महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरलाय.
आतापर्यंतच्या कलानुसार-
भाजप- 133
शिवसेना शिंदे गट- 88
राष्ट्रवादी अजित पवार गट- 85
काँग्रेस- 28
शिवसेना ठाकरे गट- 20
राष्ट्रवादी शरद पवार गट- 7
इतर- 21
महायुतीच्या 27 जागा बिनविरोध-
कोकणात महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 8, तर पंचायत समितीच्या 17 जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत. 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरे गटाला किती जागा?
मिनी मंत्रालय संबोधल्या जाणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत झाल्याचे दिसत आहे. मविआमध्ये फक्त काँग्रेसने काही जागांवर विजय मिळवलाय. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचा दारुण पराभव झाल्याचे दिसत आहे.
