मुंबई. Maharashtra Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026: नगर परिषदा, महापालिकांनंतर आज जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. शनिवारी राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्रिस्तरीय पंचायती राज्य व्यवस्थेत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना विशेष महत्व असते. गेल्या अनेक महिन्यांपासून लोकप्रतिनिधींशिवाय या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरू आहे. आज या संस्थांना लोकनियुक्त प्रतिनिधी मिळणार आहे. पुणे, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्हा परिषदांचे निकाल आज जाहीर होत आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत सममित्यांच्या निवडणुकीची घोषणा 13 जानेवारी 2026 रोजी जाहीर केली होती. यासाठी आधी 5 फेब्रुवारी ही मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्यामुळे मतदान प्रक्रिया दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले व आज 9 फेब्रुवारी रोजी या निडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. जिल्हा परिषदेच्या 731; तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर या निवडणुकीसाठी 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 पात्र मतदार होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राज्यात एकूण 68.28% मतदान झाले आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागांसाठी 2 हजार 624 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यातील 369 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 83, अनुसूचित जमातींसाठी 25 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 191 जागा आरक्षित आहेत. त्याचबरोबर 125 पंचायत समित्यांमध्ये एकूण 1 हजार 462 जागा असून त्यातील 731 जागा महिलांसाठी राखीव आहेत. पंचायत समित्यांच्या या सर्व जागांसाठी एकूण 4 हजार 814 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
राज्यामध्ये कोणकोणत्या पंचायत समित्यांची निवडणूक पार पडली? पाहा यादी
पुणे
जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर
सातारा
खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण, कराड
कोल्हापूर
शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड
छत्रपती संभाजीनगर
सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण
सांगली
आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठे महांकाळ, पलुस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा, मिरज
सोलापूर
करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट
रायगड
पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर
रत्नागिरी
मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर
सिंधुदुर्ग
वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग
परभणी
जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड
धाराशीव
परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा, उमरगा
लातूर
अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकूर, रेणापूर, लातूर, शिरूर (अनंतपाळ), देवणी, औसा, निलंगा

कोणत्या जिल्हा परिषदांना आज मिळणार लोकप्रतिनिधी?
- पुणे
- कोल्हापूर,
- छत्रपती संभाजीनगर,
- रायगड,
- रत्नागिरी,
- सिंधुदुर्ग,
- सातारा,
- सांगली,
- सोलापूर,
- परभणी,
- धाराशीव,
- लातूर
हे ही वाचा -Zilla Parishad Election Result 2026 Live: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने मारली बाजी!
