पुणे - Pawar Family Cancels Diwali Celebrations : दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. सर्वजण दिवाळीच्या खरेदीत व घराच्या साफसफाईत व्यस्त आहेत. घराघरातून रोषणाई, फराळाची लगबग दिसत आहे. सर्वसामान्यांच्या दिवाळीसोबतच राजकीय नेत्यांच्या घरातही दिवाळीची खास परंपरा असते. पवार कुटूंबीयांची दिवाळी व भाऊबीज संपूर्ण राज्यात कुतूहलाचा विषय असतो. दरवर्षी गोविंदबागेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा पवार कुटुंबियांकडून दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे.

यंदा पवार कुटुंबीयांकडून दिवाळी साजरी केली जाणार नाही, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. दरवर्षी होणारा गोविंदबागेतील दिवाळी उत्सव आणि पाडव्याच्या भेटींचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

काय आहे सुप्रिया सुळेंच्या ट्वीटमध्ये?

सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणारा सहृदांच्या भेटीचा कार्यक्रम देखील यावर्षी होणार नाही, कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी. आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो ही सदिच्छा, अशी माहिती पवार कुटुंबियांच्या वतीने सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

दरम्यान दरवर्षी दिवाळीनिमि्त्त पवार कुटुंब एकत्र येऊन मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात. बारामती येथील गोविंदबागेत भाऊबीजेचा कार्यक्रमही मोठा असतो. पाडव्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांची शरद पवार भेट घेत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठीही या दिवाळी पाडव्याचे मोठे महत्व असते. पवार कुटूंबीयांच्या दिवाळीला एक राजकीय आणि सामाजिक महत्त्व आहे. मात्र यंदा गोविंदबागेत दिवाळी होणार नसल्याने राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.