पुणे. Pune Traffic Advisory:  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि गणेश मंडळांच्या मिरवणुका, भाविकांची गर्दी तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले असून 12 ते 26 सप्टेंबरदरम्यान प्रमुख रस्त्यांवर 24 तास अवजड वाहनांना बंदी राहणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. शहरातील प्रमुख गणेश मंडळांना भेट देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतात. त्यातच विविध भागांतून निघणाऱ्या गणेशोत्सव मिरवणुका आणि वाढलेली वाहतूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रमुख रस्त्यांवर निर्बंध

वाहतूक पोलिसांनी शहरातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर जड-अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. यामध्ये शास्त्री रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड आणि शिवाजी रोड यांचा समावेश आहे.

तसेच शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या कर्वे रोड, फर्ग्युसन कॉलेज अर्थात एफसी रोड आणि जेएम रोडवरही अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

सिंहगड रोड परिसरातही बंदी

    सिंहगड रोड परिसरातील वाहतूक व्यवस्थेवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. राजाराम ब्रिज ते सावरकर चौक मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत. याशिवाय गणेश रोड आणि मुदलियार रोडवरही अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

    पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    गणेशोत्सवाच्या काळात नागरिक आणि वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अवजड वाहनचालकांनी संबंधित मार्गांवर प्रवेश न करता उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    या निर्बंधांमुळे गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. विशेषतः गणेश मंडळांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

    दरम्यान, 12 ते 26 सप्टेंबर या कालावधीत संबंधित मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतूक परिस्थितीची माहिती घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.