पुणे. 5th Swachh vayu survekshan 2026: वाहतूक कोंडी, वाहनांमधून होणारे उत्सर्जन, रस्त्यांवरील धूळ, मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले बांधकाम प्रकल्प आणि औद्योगिक प्रदूषण अशा अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या पुणे शहराने स्वच्छ हवेच्या राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026’ अर्थात नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (NCAP) अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत पुण्याने देशात 12वा क्रमांक पटकावला आहे.
दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पुण्याला 200 पैकी 183 गुण मिळाले आहेत. वाढते शहरीकरण आणि वायुप्रदूषणाची गंभीर समस्या असतानाही पुण्याने मिळविलेल्या या स्थानाकडे शहराच्या स्वच्छ हवा अभियानातील महत्त्वपूर्ण यश म्हणून पाहिले जात आहे.
ठाणे महाराष्ट्रात अव्वल
या राष्ट्रीय क्रमवारीत महाराष्ट्रातील शहरांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ठाणे शहराने देशात सातवा क्रमांक पटकावत राज्यातील शहरांमध्ये आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ नवी मुंबई नवव्या स्थानावर, तर नागपूरने दहावे स्थान पटकावले आहे.
पुण्याने बारावे स्थान मिळवत महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या स्वच्छ हवा मोहिमेतील कामगिरीला आणखी बळ दिले आहे. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची कामगिरी तुलनेने मागे राहिली असून मुंबईला या क्रमवारीत 28 वा क्रमांक मिळाला आहे.
पुण्यासमोर प्रदूषणाची मोठी आव्हाने
पुण्यात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी ही वायुप्रदूषणाची प्रमुख कारणांपैकी एक मानली जाते. त्याशिवाय मेट्रो, रस्ते, गृहनिर्माण आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे निर्माण होणारी धूळही हवेच्या गुणवत्तेवर परिणाम करत आहे.उन्हाळ्यात आणि पावसाळ्यानंतर अनेक भागांमध्ये रस्त्यांवरील धूळ, बांधकाम साहित्याची वाहतूक आणि वाहनांमधून होणारे उत्सर्जन यामुळे हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीतही राष्ट्रीय स्तरावर पुण्याने पहिल्या पंधरा शहरांमध्ये स्थान मिळविणे महत्त्वाचे मानले जात आहे.
मुंबई 28व्या स्थानावर
मुंबईतही वाहतूक, मोठ्या प्रमाणावरील बांधकामे, रस्त्यांची कामे आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे धूळ व प्रदूषणाची समस्या वाढत आहे. शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्या तरी स्वच्छ वायू सर्वेक्षणात मुंबईला 28वे स्थान मिळाले आहे.
मुंबईच्या तुलनेत ठाणे आणि नवी मुंबईची कामगिरी अधिक सरस ठरल्याने मुंबई महानगर प्रदेशातील प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांवर पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
काय आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण?
केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (NCAP) अंतर्गत देशातील शहरांच्या वायुप्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे मूल्यांकन केले जाते. शहरांमध्ये हवा प्रदूषण कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, धूळ नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, जनजागृती, प्रदूषण नियंत्रणासाठीची अंमलबजावणी आणि इतर निकषांच्या आधारे शहरांचे मूल्यांकन केले जाते.
स्वच्छ हवेच्या दिशेने शहरांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून स्थानिक प्रशासनांना अधिक प्रभावी उपाययोजना करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
महाराष्ट्रातील शहरांची उल्लेखनीय कामगिरी
दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात महाराष्ट्रातील अनेक शहरांनी राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे.
* ठाणे – देशात 7वे स्थान
* नवी मुंबई – देशात 9वे स्थान
* नागपूर – देशात 10वे स्थान
* पुणे – देशात 12वे स्थान
* मुंबई – देशात 28वे स्थान आहे.
