जेएनएन, पुणे. Pune School Holiday: भारतीय हवामान विभागाने आज दि. 6 जुलै 2026 रोजी पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे शहर व पुणे जिल्हा ग्रामीणमधील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, प्रशासन व भारतीय हवामान विभागाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं आणि सुरक्षिततेची आवश्यक काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे.
लोणावळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी
मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळा घाटात गेल्या तीन तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संथ गतीने सुरू असलेल्या वाहतुकीमुळे अनेक वाहने घाटातच अडकून पडली आहेत.
मुंबईसह संपूर्ण कोकण आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे मुंबई–पुणे मार्गावरील भोर घाट परिसरात दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.
रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित
कर्जत–लोणावळा घाट विभागात दरड कोसळल्याने मुंबई–पुणे दरम्यानची रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून अनेक गाड्या रद्द, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
हेही वाचा - Weather Update Today: राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट! घराबाहेर पडण्याआधी वाचा तुमच्या भागात कसे राहील वातावरण
पुण्यात शहरात यलो तर घाट भागात रेड अलर्ट (Pune Rain Alert)
हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यात घाट भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर शहर परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. तर खडकवासला धरणाच्या धरणप्रवणक्षेत्रात पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे
