जेएनएन, पुणे: “होय, मला शिंदेसाहेबांचा निरोप आलाय, की कोणत्याही पक्षाविरोधात किंवा व्यक्तीविरोधात बोलू नका. पण मी तरी कुठे भाजपविरोधात बोलतोय? मी फक्त जैन मंदिराची जमीन हडपणाऱ्या विकृतीविरोधात बोलतोय,”असा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतला आहे. जोपर्यंत जैन बोर्डिंगचा जमीन व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत मी बोलतच राहणार अशी ठाम भूमिका धंगेकर यांनी घेतली आहे.

काय आहे प्रकरण

पुण्यातील जैन समाजाच्या बोर्डिंगच्या जमिनीच्या कथित गैरव्यवहाराबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरु आहे. या प्रकरणात काही प्रभावशाली व्यक्तींनी जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणावर सातत्याने आवाज उठवला असून, त्यांनी प्रशासन आणि सरकारवर कारवाईची मागणी केली आहे. 

 शिंदेंचा “निरोप”

धंगेकरांच्या सातत्यपूर्ण वक्तव्यांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना अप्रत्यक्षपणे संदेश पाठवला असल्याची माहिती दिली आहे.“मला शिंदेसाहेबांचा निरोप आलाय की कोणत्याही पक्षाविरोधात बोलायचं नाही. पण मी कुठे भाजपविरोधात बोलतोय? मी फक्त अन्यायाविरोधात बोलतोय,” असं धंगेकर म्हणाले आहे.