जेएनए, पुणे. Pune Latest News: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

तातडीने चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना

या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. 

दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल

रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.

    हेही वाचा - Aurangzeb Tomb: औरंगजेबाच्या कबरीची ASI ने सुरक्षा वाढवली, केंद्रीय मंत्र्यांची राज्यसभेत माहिती

    अजित पवारांचं आवाहन

    तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.