जेएनएन, पुणे Pune Deenanath Mangeshkar Hospital News Update: पुण्यात एका गर्भवती महिलेचा रुग्णालयात उपचारांअभावी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली असून त्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकीय पक्षांबरोबरच नागरिक संघटनादेखील आक्रमक झाल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश
गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असतानाही 10 लाख रुपयांची मागणी रुग्णालयाकडून करण्यात आली होती, असा आरोप करण्यात येत आहे. मृत महिलेचं नाव तनिशा भिसे असून त्या भाजपाचे विधान परिषद आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. एकीकडे राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असतानाच दुसरीकडे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. यातच आता पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेत या चौकशी समितीत
1) उपसचिव यमुना जाधव,
2) सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी,
3) सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य असतील तर
4) विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.
त्याचप्रमाणे मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची सर्व धर्मादाय रुग्णालयांकडून प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग तसेच धर्मादाय आयुक्त यांना खालील प्रमाणे सूचना केल्या आहेत.
- धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे 'धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची' मान्यता घ्यावी. याबाबत धर्मादाय रुग्णालयांना तत्काळ निर्देश देण्यात यावेत.
- विधी व न्याय विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल व समितीच्या शिफारशी सादर केल्या आहेत. त्या शिफारशींवर तत्काळ कार्यवाही करावी.
- शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 धर्मादाय आरोग्य सेवकांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर पदे तात्काळ भरण्यात यावीत.
- निर्धन रुग्णनिधी (IPF) खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेवून ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी.
- योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुणालयांवर मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी.
हेही वाचा - Farmer Suicide in Amaravati: हा अकडा वाचून तुम्हाला धक्का बसेल! अमरावती विभागात 21,000 शेतकऱ्यांची आत्महत्या