जेएनएन पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमिनीच्या वादग्रस्त व्यवहारावर मोठी घडामोड घडली आहे. या बहुचर्चित जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
धंगेकर, जैन सदस्यांचा आक्रमक पावित्रा
माहितीनुसार, बिल्डर हेमंत गोखले यांनी या व्यवहारासंदर्भात स्वतः अर्ज देण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता निर्णायक घटना समोर येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून शिवसेना नेते रविंद्र धंगेकर हे या प्रकरणाचा पाठ पुरवठा करत होते. त्यांनी या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले होते. मात्र, जैन मुनी आणि संघटनांनी या व्यवहारानंतर आक्रमक पावित्रा घेतल्यामुळे आता हा व्यवहार रद्द होणार असल्याचे बोलले जात आहे.
वादग्रस्त व्यवहाराची पार्श्वभूमी
पुण्यातील प्रतिष्ठित जैन बोर्डिंग ट्रस्टची मौल्यवान जमीन काही काळापूर्वी विक्रीस काढण्यात आली होती. या जमिनीच्या विक्रीसंदर्भात अनियमितता आणि ट्रस्टच्या हिताला हानी पोहोचवणाऱ्या अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप काही ट्रस्टी व जैन समाजातील सदस्यांनी केला होता. त्यामुळे हा व्यवहार मोठ्या वादात सापडला होता.
नागरिक आणि जैन समाजाच्या प्रतिनिधींनी या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने आणि संबंधित संस्थांनी याबाबत गंभीर दखल घेतली होती.
आता, बिल्डर गोखले यांच्याकडून स्वतःच अर्ज दाखल होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या प्रकरणावर पडदा पडण्याची चिन्हे दिसत आहेत.जर व्यवहार रद्द झाला तर ट्रस्टच्या जमिनीचे पुनर्विलोकन करून ती मूळ उद्दिष्टासाठी विद्यार्थ्यांच्या निवास आणि शिक्षणाच्या उपक्रमांसाठी राखून ठेवली जाण्याची शक्यता आहे.