पुणे. शहरातील पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने आजपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अमलात आणला आहे. धरणांतील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

50 टक्के शहराला सम, तर 50 टक्के शहराला विषम तारखांना मिळणार पाणी-

महापालिकेच्या नव्या नियोजनानुसार शहरातील सुमारे 50 टक्के भागांना सम तारखांना, तर उर्वरित 50 टक्के भागांना विषम तारखांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या भागातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाणून घेऊन त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खडकवासला धरण साखळीत केवळ 5 टीएमसी पाणी शिल्लक

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील जलसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सध्या या धरणांमध्ये केवळ ५ टीएमसी पाणी शिल्लक असून त्यापैकी महापालिकेसाठी उपलब्ध साठा सुमारे ३ टीएमसी इतकाच असल्याचे सांगितले जात आहे. शहराच्या दैनंदिन गरजांच्या तुलनेत हा साठा अत्यंत अपुरा मानला जात आहे.

महापालिकेची तातडीची बैठक, परिस्थितीचा आढावा

    पाणीपुरवठ्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेने खडकवासला धरण साखळी, भामा आसखेड धरण आणि पवना धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेतला. याशिवाय पाटबंधारे विभागाकडून प्राप्त झालेल्या सूचना, आगामी पावसाचा अंदाज आणि शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.अधिकाऱ्यांच्या मते, सध्याच्या उपलब्ध साठ्याचा काटकसरीने वापर केला नाही तर मान्सून पूर्णपणे सक्रिय होईपर्यंत पाणीपुरवठ्याचे मोठे संकट निर्माण होऊ शकते.

    नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन-

    महापालिकेने नागरिकांना पुढील काही दिवस विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

    * नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये.

    * वाहन धुणे, बागांना अतिरिक्त पाणी देणे टाळावे.

    * गळती असलेले नळ आणि पाइप तातडीने दुरुस्त करावेत.

    * घरगुती वापरासाठी आवश्यक तेवढेच पाणी साठवावे.

    * पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी करू नये.

    मान्सूनकडे लागल्या नजरा

    शहरातील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी आता सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत. अपेक्षित पावसाला विलंब होत असल्याने धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक अद्याप समाधानकारक झालेली नाही. त्यामुळे पुढील काही आठवडे पाणीपुरवठ्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.