जेएनएन, पुणे: पुणे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आता मेट्रो प्रकल्पालाही बसल्याचे चित्र समोर आले आहे. बहुप्रतिक्षित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गावरील मान मेट्रो स्टेशनमध्ये पावसाचे पाणी साचल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या मेट्रो मार्गाचे लोकार्पण होण्यापूर्वीच स्टेशनमध्ये पाणी साचल्याने प्रकल्पाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उद्घाटनाच्या तोंडावरच ही बाब समोर आल्याने संबंधित यंत्रणांच्या कामकाजावरही चर्चा सुरू झाली आहे.

राज्याच्या काही भागांत काल पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, या पावसामुळे मान मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचल्याचे समोर आले. मेट्रो स्टेशनसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक वाहतूक सुविधेमध्ये पावसाचे पाणी साचल्याने पाणी निचरा व्यवस्था, बांधकामाची गुणवत्ता आणि पावसाळी नियोजनाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. 

छतातून पाण्याची गळती; कर्मचाऱ्यांकडून पाणी काढण्याचे प्रयत्न 

मिळालेल्या माहितीनुसार, काल हिंजवडी आणि मान परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसादरम्यान मान मेट्रो स्टेशनच्या छतामधून पाणी गळू लागले. स्टेशनमधील प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर तसेच तिकीट खिडकीजवळ पाणी साचल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. पाणी साचू नये यासाठी स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना बादल्या आणि वायपरच्या मदतीने पाणी काढावे लागले. त्यामुळे मेट्रो स्टेशनच्या बांधकामातील त्रुटींबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग हा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. सुमारे 23.2 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर एकूण 23 स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे 8 हजार 313 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना तसेच परिसरातील नागरिकांना या मेट्रोमुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

    मात्र, प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्यापूर्वीच स्थानकात पावसाचे पाणी गळू लागल्याने बांधकामाची गुणवत्ता आणि पाणी निचरा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानकातील विद्युत यंत्रणा, लिफ्ट आणि सरकते जिने यांची सुरक्षितता लक्षात घेता पाण्याची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

    उद्या 3 नोव्हेंबरला लोकार्पण, 4 नोव्हेंबरपासून प्रवासी सेवा

    दरम्यान, या बहुप्रतिक्षित मेट्रो मार्गाचे उद्या लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे या प्रकल्पाचे उद्घाटन करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात 23 पैकी 17 स्थानकांवरून 4 नोव्हेंबरपासून प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. 

    अशा परिस्थितीत उद्घाटनाच्या अवघ्या दोन दिवस आधी मान मेट्रो स्टेशनमध्ये पावसाचे पाणी साचल्याची घटना समोर आल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. उद्घाटनापूर्वी या गळतीची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती केली जाणार का, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती खबरदारी घेतली जाणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.