जेएनएन, पुणे: Tamhini Ghat Murder News: माणगाव–पुणे मार्गावरील ताम्हिणी घाट परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटातील एका आडमार्गाला फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

फॉरेन्सिक लॅबच्या पथक दाखल

या तरुणाच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या स्पष्ट खुणा आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून पंचनामा आणि पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. 

रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह 

मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील काही ग्रामस्थ नातेवाईकांना जमीन दाखवण्यासाठी ताम्हिणी घाटातील आडमार्गाने जात असताना त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा परिसर सील करून तपास सुरू केला. 

मृत तरुणाचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. प्राथमिक तपासात हा खून अन्यत्र करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ताम्हिणी घाटात आणून फेकण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    ताम्हिणी घाट परिसरात भीतीचे वातावरण

    मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ स्पष्ट होणार आहे. माणगाव पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींच्या आधारे तपासणी करत आहे. खुनाच्या घटनेमुळे ताम्हिणी घाट परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.