जेएनएन, सांगली. Sangli Weather Update: कडाक्याच्या थंडीने गेल्या काही दिवसांपासून गारठून गेलेल्या सांगलीकरांवर रात्री वरुणराजाने अचानक हजेरी लावत चिंब भिजवले. सांगली शहरासह संपूर्ण परिसरात अवकाळी पावसाने धडक दिल्याने नागरिकांना ऐन थंडीच्या काळात पावसाचा अनोखा अनुभव आला.
रात्री अचानक रिमझिम पाऊस
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात थंडीचा कडाका प्रचंड वाढला होता. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा वाढत असल्याने नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत होता. रविवारी दिवसभर मात्र थंडीचा जोर काहीसा कमी झाल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र रात्रीच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली.
पावसाने नागरिकांची उडाली धावपळ
सुरुवातीला हलक्या सरी कोसळू लागल्या, मात्र काही वेळातच सरींवर सरी कोसळल्याने रस्ते ओले झाले. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांची धावपळ उडाली. बाजारपेठ, चौक आणि रस्त्यांवर असलेले लोक आसऱ्याच्या शोधात धाव घेताना दिसले.
थंडीच्या मौसमात पावसाने हजेरी लावल्याने वातावरण अधिकच गार झाले. अनेक भागात धुके आणि गार वाऱ्यांचीही भर पडल्याने थंडीचा प्रभाव पुन्हा वाढल्याचे जाणवले. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ पाणी साचल्याचेही चित्र पाहायला मिळाले.
हेही वाचा - Raj Thackeray Rally: राज ठाकरे यांनी बाळासाहेबांची आठवण काढतं सांगितलं युती का केली याचं कारण
द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता
दरम्यान, या पावसाचा शेतकऱ्यांच्या काढणीला आलेली पिके, भाजीपाला आणि द्राक्षबागा यांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या या पावसामुळे सांगलीकरांना हिवाळ्यातील पावसाचा वेगळाच अनुभव मिळाला असून पुढील काही दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
