एजन्सी, पुणे: Pune Building Collapse: पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळली आहे. या इमारती खाली ढिगाऱ्यात किमान 16 जण अडकल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे ही घटना घडली, जिथे पालिकेच्या वतीने कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या एका खाजगी कंपनीचे प्रशासकीय कार्यालय म्हणून त्या इमारतीचा वापर केला जात होता, असे त्यांनी सांगितले.
प्रशासकीय इमारत जुन्या कचऱ्याच्या डोंगरासारख्या ढिगाऱ्याशेजारी वसलेली होती. "प्राथमिक दृष्ट्या असे दिसते की, मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा ढिगारा सैल होऊन इमारतीवर कोसळला," असे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, त्या इमारतीत खासगी कंपनीचे तब्बल 16 कर्मचारी असण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांची पथके घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
At least 15 persons feared trapped as building collapses at Pimpri Chinchwad in Pune district: Officials. pic.twitter.com/F8x7nImHuQ
— Press Trust of India (@PTI_News) July 8, 2026
दरम्यान, खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेक विसर्ग वाढवून 27,203 क्युसेक्स इतका सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून कळविण्यात आले आहे.
स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, लष्कर आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल -
या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंगल, पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना संपर्क साधला आणि मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढावे तसेच जखमी झालेल्या व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे.NDRF ची टीमही घटनास्थळी दाखल आहे.
