पिंपरी-चिंचवड -मावळ येथे इमारत दुर्घटनेनंतर  रेस्कु ऑपरेशन मध्ये 9 जणांना वाचवण्यात  बचाव पथकांना यश आले असून अंदाजे 8 ते 9 जण अजूनही अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बचावकार्य सुरू आहे. लष्कर, एनडीआरएफ (NDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल आहे, अशी माहिती डीईओसी (DEOC) ने दिली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपोला लागून असलेल्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर आज दुसऱ्या दिवशीही बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा प्रचंड डोंगर घसरून प्रकल्पाच्या इमारतीवर आदळल्याने इमारतीचा काही भाग कोसळला आणि अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले.

बचाव पथकाने आतापर्यंत एकूण 9 जणांची सुखरूप सुटका केली आहे. बुधवारी 6 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आले होते. त्यानंतर गुरुवारी आणखी 3 जणांची सुटका करण्यात आली. मात्र, तळमजल्यात अजूनही काही कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

18 तासांहून अधिक काळ ढिगाऱ्याखाली -

अडकलेले कर्मचारी गेल्या 18 तासांहून अधिक काळ ढिगाऱ्याखाली असल्याने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे मोठे आव्हान बचाव पथकासमोर आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे, क्रेन, जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याची अस्थिर स्थिती आणि सतत पडणारा पाऊस यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत असले तरी पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनास्थळी लष्कर, NDRF, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल, पिंपरी-चिंचवड पोलीस, तसेच इतर आपत्कालीन यंत्रणा संयुक्तपणे कार्यरत आहेत. प्रत्येक इंच परिसराची तपासणी करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, बचाव मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

    या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली असून, पोलिसांनी परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे.

    दरम्यान, अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा डोंगर घसरून इमारतीवर कसा कोसळला, प्रकल्पातील सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, तसेच या दुर्घटनेला नेमके कोणते कारण जबाबदार आहे, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.