पुणे. पीएम किसान योजनेचा 24 व्या हप्ता (PM Kisan Yojana 24th installment) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातहून थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केला. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT द्वारे पैसे पाठवले गेले. पैसे त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतील जे या योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांच्या अर्जात कोणतीही अडचण नाही.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमात आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथून उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाल्या होत्या.
महाराष्ट्रातील 91 लाख 12 हजार 765 शेतकऱ्यांना 1,835.01 कोटी रुपयांचा लाभ -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 9.34 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18,690 कोटी रुपयांहून अधिक सन्मान निधी वितरित करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील 91 लाख 12 हजार 765 शेतकऱ्यांना सुमारे 1,835.01 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत ही मदत बळीराजाला मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
यावेळी कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत विकसित 521 युनिट्सचे राष्ट्रार्पण तसेच 12 फलोत्पादन क्लस्टर्सचे उद्घाटनही करण्यात आले. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, आधुनिक कृषी पायाभूत सुविधा आणि फलोत्पादनाला प्रोत्साहन देणारे हे उपक्रम कृषी क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणार आहे असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
खात्यात 2000 रुपये आले की नाही? असे करा चेक
पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचे (PM Kisan Yojana 24th installment status) पैसे तुमच्या खात्यात आले आहेत की नाही, हे तुम्ही घरी बसून सहजरीत्या शोधून काढू शकता.
- सर्वात आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.
- होमपेजवर Farmers Corner मध्ये जाऊन Know Your Status वर क्लिक करा.
- आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा भरा.
- यानंतर मागितलेली माहिती आणि OTP द्वारे आपल्या ओळखीची पुष्टी करा.
- आता तुम्ही सहजरीत्या हप्त्याचे स्टेटस पाहू शकता. येथे पेमेंट जारी झाल्याची किंवा प्रलंबित असल्याची माहिती मिळू शकते.
- बँक खात्यात पैसे पोहोचले आहेत की नाही, याची पुष्टी बँकेच्या SMS, मोबाईल बँकिंग ॲप, पासबुक अपडेट किंवा बँक शाखेतून करा. फक्त पोर्टलवर पेमेंट जारी दिसण्याचा अर्थ हा नाही की, पैसे खात्यात पोहोचले आहेत.
हप्ता नाही आला तर काय करावे?
जर तुमचे पेमेंट स्टेटस दिसत नाही आहे किंवा हप्ता अडकलेला आहे, तर सर्वात आधी e-KYC आणि जमिनीशी जोडलेली माहिती तपासा. शेतकरी मदतीसाठी हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 011-24300606 वर संपर्क करू शकतात. याशिवाय पीएम किसान पोर्टल (PM Kisan portal) वर उपलब्ध किसान ई-मित्र चॅटबॉटवरूनही माहिती घेऊ शकतात.
