जेएनएन, पुणे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 5 ते 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. यातच खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांची समजूत काढण्यासाठी मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानी ठाकरेंचे दोन शिलेदार वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी भेट घेतली. या भेटीनंतर धाराशीवला जाताना ओमराजे निंबाळकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

‘माझ्या वडिलांच्या राजकीय हत्येमुळेच मी राजकारणात…’

"माझ्या वडिलांच्या राजकीय हत्येमुळेच माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. हत्येमुळे राजकीय विरोध संपत नाही; उलट, त्यातून नवीन विरोधक निर्माण होतात. हीच बाब सिद्ध करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे..." असं खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.

‘मी माझा निर्णय जाहीर करेन’

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि टीकेवर भाष्य करताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, "मी करत असलेल्या कामात सामान्य जनतेला रस आहे, हे माझ्या लक्षात आले आहे. मी माझा निर्णय अद्याप जाहीर केलेला नसतानाही, गेल्या चार दिवसांपासून माझ्याबद्दल विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. असे असूनही, काही लोक माझ्या संपूर्ण कुटुंबाला यात ओढून अनावश्यक टीका करत आहेत... माझ्या वडिलांच्या हत्येप्रकरणाचा निकाल लवकरच लागणार आहे; या लढ्यासाठी आम्ही 20 वर्षे संघर्ष केला आहे. या प्रकरणाबाबतही बरीच चर्चा सुरू आहे. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, माझ्या राजकीय निर्णयाबाबतची परिस्थिती काहीही असली, तरी धाराशिवला जाऊन आणि सर्वांशी चर्चा केल्यानंतरच मी माझा निर्णय जाहीर करेन..."

आमदारांनी घेतली भेट

    खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांची समजूत काढण्यासाठी मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरेंचे दोन आमदारांनी त्यांची भेट घेतली होती.