जेएनएन, मुंबई. महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यरात्रीच्या राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला आहे. शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘ऑपरेशन टायगर’ फेल करण्यासाठी एक महत्त्वाची चाल खेळली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांची समजूत काढण्यासाठी मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानी ठाकरेंचे दोन शिलेदार वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी हे दाखल झाले होते. ठाकरेंच्या आमदारांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पवनराजे निंबळकर हत्या प्रकरणातील सगळेच आरोपी निर्दोष सुटले. ओमराजे निंबाळकर यांना हा मोठा धक्का समजला जातो. ओमराजे यांनी ठाकरे गटातील खासदारांच्या बंडावर बोलताना आपण अद्यापही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे म्हटले होते. ओमराजे यांच्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले.
त्यातच खासदार फुटले असल्याच्या चर्चेमुळे दिल्लीत झालेल्या व्हीप बजावलेल्या बैठकीत अनुपस्थित असल्याने ठाकरे गटाने 6 पैकी 5 खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ओमराजे निंबाळकर यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
साधारण मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या मध्यरात्री झालेल्या हाय-व्होल्टेज भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या भेटीवर आपली पहिली प्रतिक्रिया देताना आमदार वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी म्हटलं की, "आम्ही केवळ मित्र म्हणून ओमराजे यांची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो,"
ओमराजे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात लागलेल्या निकालाने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेतली असल्याचे आमदार वरुण सरदेसाईंनी म्हटले.
