जेएनएन, मुंबई.  मनसे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. यावेळी त्यांनी पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असंही ठाकरे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता, पेपरफुटीच्या घटनांबाबत कारवाई आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता यांसह विविध मागण्यांसाठी पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. 

‘लवकरच चांगली बातमी येईल’ - राज ठाकरे

5 ऑक्टोबर 2026 ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत  MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.  

पेपरफुटी आणि परीक्षेतील पारदर्शकतेचा मुद्दा 

एमपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे, परीक्षांच्या तारखांबाबत अनिश्चितता आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता यांसारख्या मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणानंतरही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेग आला आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा ही त्यांची प्रमुख मागणी आहे.