जेएनएन, मुंबई. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील नागरिकांंचे डोळे आभाळाकडे लागले होते. मान्सून राज्यात कधी सक्रिय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 8 जून रोजी राज्यात दाखल झालेला मान्सून आगेकूच करत नव्हता. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली होती. आता सर्वांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. IMD ने मान्सून सक्रिय झाल्याची माहिती दिली आहे. तर मान्सून सध्या अलिबाग आणि पुणे भागातून जात आहे.
मान्सूनची सद्यस्थिती
सध्या मान्सून अलिबाग, पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बालंगीर, सुंदरगढ, चतरा, गया, मुझफ्फरपूर मधून जात आहे. राज्यात मान्सून हा अलिबाग आणि पुणे भागातून जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी दिलासाजनक बातमी आहे.
मान्सूनची आगेकूच
आज, 22 जून, 2026 रोजी, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांमध्ये, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकाच्या उर्वरित भागांमध्ये, छत्तीसगडच्या काही भागांमध्ये, तसेच ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांमध्ये प्रवेश केला आहे.
पुढील 48 तासांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये, तेलंगणा आणि ओडिशाच्या उर्वरित भागांमध्ये, तसेच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांमध्ये पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे.
23 जून रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड व बिहारच्या आणखी काही भागांमध्ये आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे.

मुंबईत पावसाच्या सरी
मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
