जेएनएन, मुंबई. Mumbai Weather Forecast: गेल्या अनेक दिवसांपासून उकाडा आणि दमट हवामानाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळला आहे. शहराच्या विविध भागांत काळ्या ढगांची गर्दी झाली असून विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मात्र, या सरींना पाहून “मान्सून दाखल झाला का?” हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत 2026 चा मान्सून दाखल
मुंबईत 2026 चा मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने (IMD) शहरासाठी 'येलो अलर्ट' जारी केला असून, 'विजांच्या कडकडाटासह वादळ' होण्याची शक्यताही वर्तवली आहे.
गेल्या आठवडाभरापासून मान्सूनची वाटचाल मंदावल्यामुळे मुंबई आणि कोकणातील नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत होती. आता हवामान खात्याने मान्सून मुंबईत दाखल झाल्याची माहिती दिली आहे. मान्सूनचा प्रभाव आता मुंबईत जाणवू लागला असून येत्या आठवडाभरात राज्यभर पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा - Monsoon 2026: मान्सून पुन्हा सक्रिय झाला रे! मुंबईत दाखल, पुण्यातही अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस
उकाड्यापासून दिलासा
यंदा जून महिन्यात मान्सूनच्या उशिरामुळे मुंबईत विक्रमी उष्ण व दमट हवामान अनुभवायला मिळाले. रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहिल्याने नागरिक हैराण झाले होते.
पुढील दोन दिवसांत मुंबईसह परिसरात पावसाचा अंदाज
आता ढगाळ वातावरण आणि अधूनमधून सुरू झालेल्या सरींमुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत मुंबईसह परिसरात पावसाचा अंदाज व्यक्त केला असून काही भागांसाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
मान्सूनच्या विलंबामुळे खरीप हंगामातील पेरण्या अनेक ठिकाणी खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. आता पावसाने जोर धरल्यास शेतीच्या कामांना वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. 25 जूननंतर मान्सून अधिक वेगाने पुढे सरकेल आणि पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
