जेएनएन, नवी दिल्ली. Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी काही उमेदवारांच्या प्रचारार्थ सभाही घेतल्या होत्या. त्यातील रोहिणीमधील उमेदवार विजेंद्र गुप्ता हे विजयी झाले आहेत.  

विजेंद्र गुप्ता मोठ्या मताधिक्यांनं आघाडीवर

देवेंद्र फडणवीस यांनी 29 जानेवारी रोजी दिल्लीतील डीसी चौक, सेक्टर 9 रोहिणी येथे भाजप उमेदवार विजेंद्र गुप्ता यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. या सभेला फडणवीस यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. मोठ्या संख्येनं मराठीजन हे प्रचार सभेला आले होते. याचाच परिणाम दिल्ली विधानसभेच्या रोहिणी मतदार संघात दिसून आला आहे. येथील भाजपा उमेदवार विजेंद्र गुप्ता हे मोठ्या मताधिक्यांनं विजयी झाले आहेत.

रोहिणीतून विजेंद्र गुप्ता विजयी

रोहिणी मतदार संघातील भाजपाचे उमेदवार विजेंद्र गुप्ता हे सध्या 37448 मतांनी विजयी झाले आहेत. एकूण 17 फेरी मध्ये त्यांना 69 हजार 890 मते मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधात असलेले आपचे उमेदवार प्रदीप मित्तल यांना 32,442 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस उमेदवार सुमेश गुप्ता यांना 3,721 मते मिळाली आहेत.

    मोहन सिंह 17578 मतांनी विजयी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघातील दयालपूर परिसरातही भाजपा उमेदवार मोहन सिंह बिश्त यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. या मतदार संघात मोहन सिंह हे 17578 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 20 फेरी मध्ये 85,215 मते पडली आहेत. तर त्यांचे विरोधी आपचे उमेदवार अदील अहमद खान यांना 67,637 मते पडली आहेत.

    बाबरपूर मधून आपचे गोपाल राय विजयी

    बाबरपूर विधानसभा मतदारसंघात बलवीर नगर भागात फडणवीसांनी भाजपा उमेदवार अनिल कुमार वशिष्ठ यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. ते या मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. आपचे गोपाल राय यांनी 18994 मतांनी विजय मिळवला आहे. तर अनिल कुमार वशिष्ठ यांना 57,198 मते मिळाली आहेत.

    गोकलपूरमधील उमेदवार पराभूत

    दिल्ली विधानसभा निवडणुकी दरम्यान, गोकलपूर विधानसभा मतदारसंघातील मदर डेअरी परिसरात भाजपा उमेदवार प्रवीण निमेश यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. प्रवीण निमेश यांचा पराभव झाला आहे. एकूण 23 फेरीमध्ये त्यांना 72 हजार 297 मते मिळाली आहेत. ते सुरेंद्र कुमार यांच्याकडून 8 हजार 207 मतांनी पराभूत झाले आहेत.