पुणे. Koregaon Bhima Vijay Stambh Abhivadan: कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. यंदाही होणारी मोठी गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी बंदोबस्ताची सविस्तर माहिती दिली. कोरेगाव भीमा परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक उपाययोजना करण्यात आले आहेत.
परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी पाच वॉच टॉवर उभारण्यात आले असून, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत निगराणी ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील भागांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. तसेच, गर्दीचे नियोजन, वाहनतळ व्यवस्था, मार्गदर्शन फलक, तसेच प्रवेश व निर्गमन मार्ग स्वतंत्र ठेवण्याची तयारी पोलिसांनी पूर्ण केली आहे.
भाविकांची तपासणी, संशयास्पद हालचालींवर लक्ष, तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक आणि वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, शांतता राखावी आणि कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे ग्रामीण पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
