जेएनएन, कोल्हापूर. Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्हा दुहेरी हत्याकांडानं हादरला आहे. काही वर्षापूर्वी दारुड्या पोरानं दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईची हत्या केली व तिचं काळीज शिजवून खाल्ल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला होता. आता पुन्हा एका दिवट्याने आईच्या हाताची नस कापून व चेहऱ्यावर वार करून तसेच वडिलांच्या डोक्यात काठीने वार करून आपल्या जन्मदात्यांना संपवलं आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील महावीर नगर परिसरात शुक्रवारी पहाटे घडली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
विजयमाला नारायण भोसले (वय 70) आणि नारायण गणपतराव भोसले (वय 78) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. तर सुनील नारायण भोसले (वय 48) असे आरोपी मुलाचे नाव आहे. जन्मदात्यांची हत्या केल्यानंतर सुनिल स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला व त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार सुनीलने अत्यंत थंड डोक्याने आपल्या आई-वडिलांना संपवलं. त्याने आधी धारदार वस्तूने आईच्या हाताची नस कापली व काचेच्या तुकड्याने चेहऱ्यावरही वार केला. आई रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण होऊन पडली. आतील खोलीत झोपलेल्या वडिलांना बाहेर काय चाललंय याची काहीच कल्पना नव्हती. जागे झाल्यानंतर त्यांनी सुनिलला तुझी आई कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर त्याने पाठीमागे असल्याचे सांगितले आणि वडील मागे वळताच पाठीमागून त्यांच्या डोक्यात काठीने प्रहार केला. त्यांच्या शरीरावरही काचेच्या तुकड्याने वार केले. डोक्यात काठीने केलेला प्रहार इतका वर्मी होता की, वडील नारायण भोसले जागीच गतप्राण झाले.
कारण आलं समोर -
आई-वडिलांची हत्या करण्यामागे घराची वाटणी हे कारण असल्याचं समोर आलं आहे. आरोपी सुनिल भोसले आई-वडिलांसह हुपरी येथील महावीर नगरमधील अल्फालाईन गल्लीत रहात आहे. त्याला दोन मोठे भाऊ असून थोरले दोन भाऊ चंद्रकांत व संजय यांचे सराफी दुकान आहे. व्यवसायानिमित्ताने ते दोघेही बाहेरगावी वास्तव्यास असतात. सुनिलचेही लग्न झाले असून त्याला एक मुलगा व मुलगी आहे. पण त्याच्या सततच्या त्रासामुळे पत्नी मुलांसह माहेरी बेळगावला असते. त्यामुळे तो आई वडील यांच्यासोबत राहत होता.
मागील काही महिन्यांपासून त्याने घराची वाटणी करण्याचा तगादा आई-वडिलांकडे लावला होता. मात्र आई-वडील त्याच्या मागणीकडे लक्ष देत नव्हते. यामुळे चिढलेल्या सुनिलने शुक्रवारी आई-वडिलांची हत्या केली.
विशेष म्हणजे आई-वडिलांची हत्या केल्यानंतर सुनिल घराबाहेर आला व रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना हसतमुखाने बोलू लागला. त्यानंतर तो स्वतःहुन हुपरी पोलिस ठाण्यात गेला व घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन घटनास्थळ गाठले असता त्यांना दोन मृतदेह दिसले. या घटनेनंतर भोसले यांच्या घरासमोर बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती.
