जेएनएन, पुणे: पुण्यातील अत्यंत वादग्रस्त ठरलेला “जैन बोर्डिंग हाऊस” (Jain Boarding Pune) जमीन विक्रीचा व्यवहार अखेर रद्द होणार आहे, अशी चर्चा सुरु आहे. या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिक गोखले बिल्डर्स (Gokhale Builders Pune) या प्रतिष्ठित कंपनीला मोठा आर्थिक धक्का बसण्याची शक्यता आहे. या व्यवहारासाठी गोखले बिल्डर्सकडून ट्रस्टींना तब्बल 230 कोटी रुपयांचा आगाऊ मोबदला दिला गेला होता. आता व्यवहार रद्द झाल्यास ही रक्कम परत मिळण्याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
असा आहे प्रकरण
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात असलेले जैन बोर्डिंग हाऊस हे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व असलेले स्थळ आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी या जागेचा विक्रीचा करार गोखले बिल्डर्ससोबत करण्यात आला होता. या जागेवर मोठा रिअल इस्टेट प्रकल्प उभारण्याची योजना होती. मात्र, जैन समाजातील नागरिक, विद्यार्थी आणि काही माजी ट्रस्टी यांनी या विक्रीला तीव्र विरोध दर्शवला होता.
समाजाचा विरोध आणि आंदोलन
जैन समाजाच्या विविध संघटनांनी या निर्णयाविरोधात मोर्चे, निदर्शने आणि कायदेशीर लढा सुरू केला होता. ही जागा जैन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि राहण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे ती व्यावसायिक हेतूसाठी विकणे हे समाजद्रोहक ठरेल, असा आरोप करण्यात आला.