जेएनएन, पुणे. अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या व्हिडिओवरून निर्माण झालेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने भाजप नेत्यांना फटकारले असे म्हणणे योग्य ठरणार नाही. न्यायालयाने या प्रकरणात आपले मत मांडले असावे, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, संबंधित व्हिडिओ डिलिट करण्याचा निर्णय हा मुंबई महापालिकेचा होता, असे स्पष्ट करत त्यांनी या निर्णयाचे समर्थन ,जबाबदारी महापालिकेवर सोपवणारी भूमिका मांडली.

हायकोर्टाच्या निरीक्षणांवर फडणवीसांचे स्पष्टीकरण 

दिया मिर्झा यांच्या व्हिडिओवरून मुंबईत राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत अभिनेत्री दिया मिर्झा यांनी नागरिकांना फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या व्हिडिओवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी आक्षेप घेतला. दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

यानंतर मुंबई महापालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिया मिर्झा यांचा व्हिडिओ हटवण्यात आला. विशेष म्हणजे, याच मोहिमेतील अभिनेत्री माधुरी दीक्षित, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि अन्य सेलिब्रिटींचे व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर कायम ठेवण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.  

मुंबई हायकोर्टाने काय म्हटले? 

या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने दिया मिर्झा यांचा व्हिडिओ हटवण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. पर्यावरण आणि प्रदूषणाबाबत जनजागृती करणाऱ्या मोहिमेला वेगळा रंग देणे दुर्दैवी असल्याचे न्यायालयाने नमूद केले. 

    भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून कोणत्याही व्यक्तीला तिच्या धर्म, जात किंवा विचारांमुळे सामाजिक जनजागृतीच्या कामापासून दूर ठेवता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच, हटवण्यात आलेला दिया मिर्झा यांचा व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला दिले. 

    ‘दिया मिर्झा काही देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत’ 

    दरम्यान, पुण्यात हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या लोकार्पणानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादाबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी हा विषय फार मोठा नसल्याचे सांगितले. फडणवीस म्हणाले, “मला वाटत नाही की उच्च न्यायालयाने फटकारले असेल. त्यांनी आपले मत व्यक्त केले असेल. कारण हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलेच नाही, तर फटकारण्याचा प्रश्न येत नाही.” 

    व्हिडिओ हटवण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता ते म्हणाले, “व्हिडिओ डिलिट केला ही मुंबई महापालिकेची मर्जी. ज्यांचे सोशल मीडिया हँडल आहे, त्यांना त्यावर काय ठेवायचे आणि काय काढायचे, याचे अधिकार आहेत. त्यांनी त्याप्रमाणे ते केले आहे.” 

    दिया मिर्झा यांच्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, “दिया मिर्झा या चांगल्या प्रथितयश अभिनेत्री असतील; पण त्या काही भारताच्या खूप मोठ्या नेत्या नाहीत.