बीड - अहिल्यानगर जिल्ह्यात एका भरधाव वाहनाने धडक दिल्याने रात्रीच्या गस्तीवर असलेल्या 29 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी माहिती दिली.
ही घटना गुरुवारी घडली. सुदाम राजकुमार पोकळे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते कर्जत पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या राशिन पोलिस चौकीत कार्यरत होते.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोकळे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह राशिन गावात रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. तेव्हा एका बेदरकार वाहनाने कॉन्स्टेबलला धडक दिली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वाहन चालकाने गाडी न थांबवता तुफान वेगात घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अज्ञात वाहन आणि त्याच्या चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोकळे यांच्या पश्चात त्यांचे आईवडील, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शोकाकुल कुटुंबाला सांत्वन दिली. पोकळे एक समर्पित आणि प्रामाणिक पोलिस कर्मचारी होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
