नाशिक- Ashok Kharat Case Nashik Crime News: अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत नागरिकांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात यांच्या विरोधात धक्कादायक माहिती समोर येत आहे. मृत्यूची भीती दाखवून एका व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात दहावा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत 10 वा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात विरोधात 8 आणि त्याच्याशी निगडीत 2 असे एकूण 10 गुन्हे आता खरातविरोधात दाखल करण्यात आले आहेत. मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी अशोक खरातविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बांधकाम व्यवसायिक राजेंद्र जासूद यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, अशोक खरातने संबंधित व्यावसायिकाला “तुझ्यावर मृत्यूचे संकट आहे” असे सांगत भीतीचे वातावरण निर्माण केले. या भीतीतून सुटका करून देण्याच्या नावाखाली त्याने मोठ्या प्रमाणात पैसे आणि ऐशोआरामाच्या सुविधा उकळल्याचे उघड झाले आहे.
या फसवणुकीदरम्यान व्यावसायिकाकडून आलिशान Mercedes-Benz कार घेतली गेली. इतकेच नव्हे तर तब्बल 21 देशांचा परदेश दौरा देखील त्याच्याकडून करवून घेतल्याचा आरोप आहे. पूजा विधीसाठी व प्रगतीसाठी 21 देशातील माती आवश्यक असल्याचे सांगून व्यावसायिकाला फिरवण्यात आले. या दौऱ्यांवर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.
हे ही वाचा -Ashok Kharat: खरातचा नवा कारनामा! आई-वडिसांसोबत करिअरसाठी सल्ला घ्यायला आलेल्या तरुणीवर अत्याचार
फार्महाऊससाठी किचन, फर्निचर बनवून घेतले -
तसेच, खरातने स्वतःच्या फार्महाऊससाठी किचन, फर्निचर आणि इतर सोयीसुविधा देखील या व्यावसायिकाकडून तयार करून घेतले आहे. धार्मिक विधी, पूजा आणि संकट निवारणाच्या नावाखाली सतत पैशांची मागणी केली जात होती, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली असून, अशोक खरातविरोधातील गुन्ह्यांची संख्या आता दहावर पोहोचली आहे. यापूर्वीही महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे आरोप त्याच्यावर झाले आहेत.
पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आणखी पीडित समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धेविरोधात पुन्हा एकदा कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
