मुंबई. Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता राजकारणातही उमटायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधात अनेक नेते या प्रकरणाने अडचणीत आले असतानाच आमदार पडळकर यांनी जयंत पाटलांबाबत सनसनाटी आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, जयंत पाटील मुलाला घेऊन मिरपूरला खरातच्या मठात गेले होते, तेथे त्यांना रक्ताने अंघोळ घातली गेली. एकीकडे फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे भोंदूबाबांना घरी आणायचं, पूजा करायची, अशी टीकाही पडळकरांनी जयंत पाटलांवर केली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, काही नेत्यांचे सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो व्हायरल होत आहेत. त्याला महत्त्व नाही. कोणीतरी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नेते मंडळी जातात त्यावेळी असे फोटो समोर येतात. मात्र मंदिरात जाणं, मठात जाणं, त्यानं सांगितलेल्या पूजा पद्धतीचा अवलंब करणं हे घातक आहे. जयंत पाटील यांची याबाबत सखोल चौकशी व्हावी.
जयंत पाटील मुलाला घेऊन खरातकडे गेले होते -
मला आमच्या नाशिकच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, जयंत पाटील आपल्या मुलाला घेऊन अशोक खरातच्या मठात आले होते. त्यांना खरातने रक्ताने आंघोळ घालली. ते रक्त मानवी होते की, आणखी कशाचे होते, याचा तपास लागला पाहिजे. खरात याने पाच नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना कोणाच्या रक्ताने अंघोळ घातली, हे समोर आले पाहिजेत. जयंत पाटील हे स्वत:ला पुरोगामी नेते म्हणवतात. ते देवधर्म मानत नाहीत. मग ते अशोक खरातकडे कशासाठी गेले होते, हे सर्वांना समजले पाहिजे. मी तर डोक्यावर तांब्याचे भांडे घेतलेला जयंत पाटील यांचा व्हिडिओ कधी बाहेर येतो, याची वाट पाहात आहे.
खरातने अनेक महिलांवर अत्याचार केला आहे. याबाबत जयंत पाटील यांची काय भूमिका आहे? हे पण तपासायला पाहिजे. गर्भवती महिलांवर अत्याचार करणारा यांचा गुरू आहे. खरात जयंत पाटील यांच्याकडे पूजा घालतो, हे संपूर्ण ईश्वरपूरला माहिती आहे. जयंत पाटील यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे.
जयंत पाटील मंत्री असताना त्यांनी अशोक खरात याच्यासाठी 40 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन दिली. लोकांना पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी नसताना एकट्ला पाण्याची पाईपलाईन का दिली, असा सवालही पडळकरांनी उपस्थित केला.
