जेएनएन, नवी दिल्ली. Ashadhi Wari 2025: आषाढी यात्रेला अवघे दोन दिवस उरले असून संपूर्ण राज्यातील वातावरण विठ्ठलमय झाले असून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. भाविकांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी एसटी महामंडळ पुढं सरसावलं आहे. एसटी महामंडळाकडून आषाढी यात्रेसाठी (pandharpur wari) राज्यभरातून 5 हजार 200 विशेष बसेस सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.


प्रताप सरनाईक म्हणाले की, या बसेस घेऊन पंढरपूरला येणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांच्या चहा, नाष्टा व जेवणाची मोफत 40 व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील कोणत्याही गावातून अथवा त्याहून अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध दिली जाणार आहे. त्यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहनही सरनाईक यांनी केले आहे.

पुण्यातून पंढरपूरला 325 स्पेशल बसेस धावणार

आषाढी वारीसाठी पुणे विभागाकडून स्पेशल गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकासह 14 बस आगारातून 325 अतिरिक्त बसेस धावणार आहेत. शनिवार (5 जुलै) आणि रविवारी (6 जुलै) रोजी या विशेष बसेस धावणार आहेत. त्याचबरोबर नियमित गाड्याही धावणार असल्याने भाविक प्रवाशांची सोय झाली आहे. पुण्यातून विशेष बसेस धावणार आहेत, त्याचबरोबर नागपूर व अमरावती विभागाच्या प्रत्येकी 150-150 बसेस स्वारगेटमार्गे पंढरपूरला रवाना होणार आहेत. यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाने 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. त्याचबरोबर तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पथक, वाहन चाचणी व अतिरिक्त कर्मचारी आणि वारकऱ्यांच्या मदतीसाठी स्वंयसेवक नियुक्त केले आहेत.

नगर जिल्हयातून 400 एसटी बसेस धावणार -

अहिल्यानगर जिल्ह्यातून एसटी बसेसच्या पंढरपूरकडे 400 बसेस धावणार आहेत. त्यामध्ये नगर विभागाच्या 250, धुळे विभागाकडून 75 व जळगाव विभागाच्या 75 एसटी बसेसचा समावेश. या सर्व गाड्या तारकपूर बसस्थानकावरून सुटतील. शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा आगारातून या बसेस सुटणार आहेत.

    नाशिक जिल्ह्यातून पंढरपूरकडे 300 जादा बसेस-

    आषाढीनिमित्त एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाकडून पंढरपूरकडे जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यातून 300 जादा बसेस धावणार आहेत. नाशिक, मालेगाव, सटाणा, कळवण, मनमाड, चांदवड, येवला, लासलगाव, पिंपळगाव, नांदगाव, सिन्नर, इगतपुरी व पेठ येथून बस सोडल्या जाणार आहेत.