जेएनएन, पुणे; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास अत्यंत व्यावसायिक आणि योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) दिली आहे. अपघाताच्या पहिल्याच दिवसापासून तपास पद्धतशीर आणि प्रोफेशनल पद्धतीने सुरू असल्याचे सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी स्पष्ट केले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी तपासाची आतापर्यंतची दिशा, गती आणि विविध तपासाच्या अंगांबाबत सविस्तर माहिती दिली. 

तपास बहुआयामी पद्धतीने सुरू! 

सुनील रामानंद यांनी सांगितले की, विमान अपघात हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाला की त्यामागे अन्य काही कारणे आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे. या आकस्मिक मृत्यूमागे घातपाताची शक्यता आहे का, हाही तपासाचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. 

तसेच, या घटनेत कोणताही गुन्हेगारी कट किंवा नियोजित षड्यंत्र होते का, याचीही चौकशी विविध तपास यंत्रणांच्या समन्वयातून केली जात आहे. 

तांत्रिक आणि फॉरेन्सिक तपासावर भर

    सीआयडीकडून विमानाचे तांत्रिक तपशील, उड्डाणापूर्वीची देखभाल, हवामान परिस्थिती, पायलटचा संवाद तसेच संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. फॉरेन्सिक आणि तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेत तपास अधिक अचूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती देण्यात आली.

    तपासात पारदर्शकता राखण्याचा दावा

    तपास प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात असून कोणतीही शक्यता नाकारलेली नसल्याचे रामानंद यांनी सांगितले. सर्व पुरावे आणि तांत्रिक अहवालांच्या आधारे अंतिम निष्कर्ष काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

    अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

    या संवेदनशील प्रकरणात विविध अफवा आणि अप्रमाणित माहिती पसरत असल्याने नागरिकांनी अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवावा, असे आवाहन सीआयडीकडून करण्यात आले.