जळगाव – Crime News : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका 20 वर्षीय तरुणाची जमावाने बेदम मारहाण करत हत्या (mob lynching in jamner) केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलगा अल्पवयीन मुलीसोबत सायबर कॅफेत बसल्याच्या संशयावरून जमावाकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात 9 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावचे पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी सांगितले की, 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली असून पाच जणांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.
मृत तरुण पोलीस भरतीचे स्वप्न पाहत त्याची तयारी करत होता तसेच वडिलांना शेतीकामात मदत करत होता. पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठीच तो आपल्या गावातून 20 किलोमीटर दूर जामनेरमध्ये नेट कॅफेत गेले होता. तेथे अल्पवयीन मुलीसोबत बसल्याचे पाहून 9 लोकांच्या जमावाने त्याला बेदम मारहाण केली.
त्यानंतर सायंकाळी साडे चारच्या सुमारास तरुणाच्या गावात जाऊन बसस्टँड व त्याच्या घराजवळही काठी व लोखंडी रॉडने मारहाण केली. तरुणा वाचवायला आलेल्या त्याच्या पालकांनाही जमावाने मारहाण केली.
या बेदम मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला त्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर सोमवारी रात्री जामनेरमध्ये तणावाचे वातावरण होते. तरुण ज्या समाजाचा होता त्या समाजाच्या लोकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जामनेर व तरुणाच्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे आयजी दत्तात्रेय कराळ यांनी जामनेरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
मृत तरुणाच्या नातेवाईकांना माध्यमांना सांगितले की, ज्या कॅफेत मारहाण झाली ते ठिकाण पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यांनी म्हटले की, जर तरुणाची चुकी असेल तर त्याला पोलिसांच्या हवाली करायला पाहिजे होते. दरम्यान पोलिसांनी ऑन कॅमेरा पोस्ट मार्टम करण्याची मागणी केली आहे. जामनेर पोलिसांनी संशयितांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.