जेएनएन, नाशिक: शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शाळांच्या 50 मीटर परिघात जंक फूड विक्रीवर बंदी घालत संबंधित यंत्रणांना कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, नाशिक शहरात या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील मुख्य आणि गर्दीच्या भागांतील अनेक शाळांच्या प्रवेशद्वाराबाहेरच जंक फूडचे स्टॉल्स आणि हातगाड्या राजरोसपणे थाटण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

शालिमार, सीबीएस, पंचवटी, सातपूर, सिडको, रविवार कारंजा, अशोक स्तंभ आणि जुने नाशिक यांसारख्या शहरातील प्रमुख भागांमध्ये अनेक शाळांच्या परिसरात जंक फूड विक्रेत्यांची मोठी गर्दी दिसून आली. शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांची या स्टॉल्सवर मोठी वर्दळ असल्याचेही पाहणीत आढळून आले. पॅकेज खाद्यपदार्थ, तळलेले पदार्थ, चटपटीत स्नॅक्स, अतिप्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ आणि साखरेचे प्रमाण अधिक असलेली पेये यांची विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली. 

शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणाऱ्या अशा खाद्यपदार्थांमुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान वयात जंक फूडचे वाढते सेवन लठ्ठपणा, पचनाच्या समस्या, दातांचे विकार आणि पोषणातील असमतोल यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे शाळांच्या परिसरात जंक फूड विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

आदेश असूनही कारवाईचा अभाव?

अन्न व औषध प्रशासनाने शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूड विक्री रोखण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या असल्या, तरी शहरातील अनेक भागांत या नियमाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी शाळांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हातगाड्या आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभे असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित यंत्रणांकडून नियमित तपासणी केली जाते का, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागरिकांनीही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

शाळा प्रशासनाचीही जबाबदारी 

    विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा प्रशासनानेही परिसरातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शाळांच्या प्रवेशद्वाराबाहेर जंक फूडची विक्री होत असल्यास त्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित विभागांना माहिती देणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांमध्ये सकस आहाराबाबत जनजागृती करणे, पालकांशी संवाद साधणे आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या सवयी विकसित करण्यासाठी विशेष उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

    संयुक्त कारवाईची गरज

    शाळांच्या परिसरातील जंक फूड विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महापालिका, शिक्षण विभाग, पोलीस आणि शाळा प्रशासन यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याबरोबरच शाळांच्या ५० मीटर परिसराची नियमित पाहणी करणे, अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करणे आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करणे गरजेचे आहे. 

    शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी तयार करण्यात आलेली नियमावली कागदावरच राहू नये, यासाठी नाशिकमधील संबंधित यंत्रणांनी तातडीने मोहीम राबवून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.